Sunday, February 7, 2010

मराठी माणसाचे उद्योग आणि धंदे

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०


आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाच्या काही गरजा असतात. काही दैनंदीन, निरंतर असतात काही कधीतरी किंवा अचानक निर्माण होणार्‍या असतात. त्यासाठी प्रत्येकालाच कुणावर तरी अवलंबून रहावंच लागतं. अश्या स्वरुपाच्या निरंतर किंवा आकस्मिक सेवा-सुविधा पुरवणं हा देखील उद्योग-धंद्याचाच एक भाग असतो. यासाठी काय लागतं? तर एखादं कौशल्य किंवा ह्या सेवा-सुवीधा पुरवण्याची तयारी, सहज संपर्काचं एखादं माध्यम किंवा आवश्यक असेल तिथे एखादी जागा. ही ज्याची तयारी आहे तो कोणताही छोटा मोठा उद्योग-धंदा करु शकतो. अश्या उद्योग-धंद्याची समाजाला कायम गरज असते. गरज आणि ती गरज पुरवणार्‍या व्यक्तीची गाठभेट जिथं होते, तिथुन उद्योग-धंदा सुरु होतो.
भय्यागीरी
उत्तरेतला भय्या हा मातीच्या गोळ्यासारखा असतो. तो त्याचे तुंम्हाला पाहिजे तसे आकार बदलतो, पण त्याचा मातीचा गूण कधीच सोडत नाही. भय्या हा पृथ्वीतलावरचा सगळ्यात लवचीक, संयमी प्राणी आहे. तो रिक्षा-टॅक्सीत झोपतो, दिवसभर काम करतो, सार्वजनीक संडासात किंवा मोकळ्या जागेत सगळे विधी आटोपतो. वेळेला केळे किंवा चुरमुरे, वडापाव खातो, छप्पर असेल तर डाळ-भात स्वतः शिजवून खातो, एका गालावर मारलीत तर फक्त त्याजागी चोळतो. प्रतिकार करत नाही, सटकण्याच्या प्रयत्नात असतो. तो आपली चुक मान्य करतो, त्याला आंघोळीची, घामाची, कपडयांची पर्वा नसते. तो दुध तर देतोच पण प्रसंगी भटजीही होतो, मच्छी विकतो, भाजी विकतो, चणे-शेंगदाणे विकतो, पाणिपुरी बनवतो, पानपटटी चालवतो, वडापाव बनवतो, हार-गजरे विकतो, तो कपडे विकतो, धुतो, त्या कपडयाना इस्त्री करतो, पिठाची गिरण चालवतो, केस कापतो, सुतार बनतो, मेडीकल दुकान चालवतो, तो वकील बनतो. भय्या सगळ्या रुपात दिसतो. कारण तो फक्त काम आणि काम करतो. त्याला कामाची लाज वाटत नाही. त्याला लोक काय म्हणतील याची शरम वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रदेश सोडतांना प्रत्येक भय्या हा गरीब असतो. दरीद्री असतो. तो फार शिकलेलाही नसतो.
मराठी माणसाचे उद्योग
मराठी माणसाचे उद्योगाच्या संदर्भात काही समज आहेत. म्हणजे असे की, मराठी माणूस हा धंदेवाईक नाही (आणि जो धंदेवाईक नसतो तो सालस, सुसंस्कृत असतो!) व्यवसाय करणे म्हणजे लबाडी करणे, ग्राहकांना लूटणे, ते त्याच्या संस्कारात बसत नाही (फक्त त्याला लूटून घ्यायला आवडते) जे यशस्वी झालेली मराठी व्यावसायीक आहेत ते इतरांना घाबरवत राहतात. किंवा जे अयशस्वी आहेत ते धंदा कसा करावा याचे शिक्षण देत राहतात. त्यातले काही मराठी मराठी करत संघटना बांधतात राहतात (हा धंदा चांगला आहे!) बाकीचे फर्डे वक्ते बनतात. सचोटी, प्रामाणिकपणा याविषयी अखंड बडबडत राहतात (ज्याचा कदाचित उद्योग-धंद्याशी संबध नसावा). स्टॉक मार्केटला शिव्या देणे, पैशावर (तोंडी) थुंकणे, धंद्यावर लाथ मारणे हे काहींचे आवडते उद्योग. आपल्या व्यवसायाची इतरत्र कुठेही शाखा न खोलणे आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणे, चादर पाहुन हात-पाय पसरणे (खरंतर हात-पाय पाहुन चादर पसरणे किंवा थेट चादरीची घडी घालणे इ.) त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी माणसाच्या उद्योगाची भरारी इतरांच्या तुलनेत काही फुटापर्यंतच राहते.
मराठी माणसाचे धंदे
मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भुमीपुत्र, त्यामुळे पहिला मान त्याचा. तो मान चुकला की त्याचा पारा चढतो. हे पण समजू शकते, पण त्याचा मान चुकवला कुणी? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जबाबदारीची आणि कष्टाची वेळ सोडा चाहुल जरी लागली तरी तो मागे हटतो. खरंतर मराठी माणसानं ठरवलं आणि बेफाम काम करायची हिंम्मत दाखवली तर ब्रम्हदेवाचा बापही त्याला तसे करण्यासाठी रोखू शकणार नाही. पण मराठी माणूस असे करीत नाही. मराठी माणूस सणाला कर्ज काढतो, वर्षाला सत्यनारायण घालतो, श्रावण तर पाळतोच पण हल्ली मार्गशिर्षातले गूरुवारही घालतो, गणपती- शिमग्याला गावाला जातो, संध्याकाळी टिव्हीवरच्या टुकार सिरिअल्स पहातो, आणि रविवारची न चुकता कोंबडी सोलत बसलेला असतो. त्यावेळी भय्या, गुजराती, आणि मारवाडी, आणि दक्षिण भारतीय दिवसाचे बारा-पंधरा तास राबत असतो.
गणेशोत्सव, होळी(धुळवड), भंडारा, देव-धर्म आणि अस्मितेशी संबधीत जयंत्या-पुण्यतिथ्या, माघी गणेशोत्सव, लग्नकार्य, दुर्गोत्सव (म्हणजे थोडक्यात गरबा) या धंद्यात मराठी माणूस जेवढा ऍक्टीव्ह असतो तेवढा तो इतरवेळी कधीच नसतो. नवतरुण मंडळे स्थापणे, अध्यक्ष-उपाध्यक्ष बनणे, वर्गणी काढणे हा सगळ्यात आवडता धंदा या सगळ्यावर नजर टाकली तर लक्षात येतं की इथं कष्टापेक्षा मिरवणेच जास्त असतं.
धंद्याची गोष्ट
आपल्याला हे माहीत नाही का? की आज मुंबईत कोणताही धंदा करायला केवळ तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा कौशल्य असून चालत नाही, किंवा तुम्ही फक्त प्राणाणिक असूनसुध्द्दा चालत नाही. धंद्याला नुसती सचोटी किंवा भांडवल पुरत नाही. आहे त्या परस्थीतीशी जुळवून घेऊन पुढे व्हावे लागते. लवचिकता अंगात भिनवावी लागते. आज धंद्यासाठी कोणताही परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याला पैसे चारावेच लागतात, त्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, असा सार्वत्रीक अनुभव आहे. रस्त्यावर उद्योग-धंदा करणार्‍याकडून पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी पैसे खातात हे दिसतं. बाकी न दिसणार्‍या गोष्टीही बर्‍याच आहेत. प्रोटेक्शन मनी हा काय प्रकार आहे ते स्थानीक नगरसेवकाना विचारुन घ्या. सरकारी / कागदी यंत्रणेजवळ फक्त मराठीत बोललात म्हणून तुमचे काम होईल असे समजू नका (कदाचित त्यामुळे काम न होण्याचीच शक्यता जास्त). त्या व्यवस्थेला पाच-पन्नास रुपयांचे इंधन कायम पुरवीत जा. (इथे या वाक्याचा अर्थ लाच देणे असा वाटल्यास, तो तसाच समजावा!) जे आपण आज बदलू शकत नाही, त्याचा विचारही करणं सोडा. मला एक १९ वर्षांचा बबलू नावाचा तरुण माहीत आहे. जो उत्तरेतला भय्या आहे. ज्याने आत्तापर्यंत कोलकत्ता, बँगलोर, आणि मुंबई या देशातल्या तीन मोठया शहरात जाऊन वेगवेगळे धंदे केले आहेत. रस्त्यावर कुठेही धंदा मांडायला त्याला लाज आता भीतीही वाटत नाही. त्याला मुंबईतले एकूण सहा होलसेल बिझनेस माहीत आहेत. (तुम्हाला माहीती आहेत?)
मराठी माणसाने आपल्या मराठी बाण्याच्या आणि ताठ कण्याच्या गोष्टी बाजूला ठेऊन फक्त काम करायचे ठरवले तर आज जी त्याची भिकार अवस्था होत चालली आहे ती थांबण्यास मदत होईल. आता तरी कुणी अवतार घेण्याची त्याने वाट बघू नये. सरळ उद्योग-धंद्याला लागावे. नाहीतर मराठी माणसाला धंद्याला लागायला वेळ लागणार नाही !
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

4 comments:

sharayu said...

उत्तरप्रदेशीयाना माझा विरोध ते मुंबईची रूढ व्यवस्था नाकारून येथे उत्तरप्रदेशी बजबजपुरी येथे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून.

PravinDhopat said...

sharyu,

keval rag vyakt karun kay upyog. apanach uttarpradeshina space karun dili na?

Mobi Dhuri 9224524892 said...

घोडा घास से यारी करे तो खाए क्या
प्रसिद्धीसाठी सर्व काही
धुरी एक्सप्रेस वृत्तसंस्था
साप्ताहिक धुरी एक्सप्रेस न्यूज वितरण
सर्व प्रकारचे फोटो/शूटिंग
सर्व वृत्तपत्रे टिव्ही चॅनेल्स, बँनर्स, होडिंग जाहिराती
हैडबिल वितरण
वेब डिझायनिंगमोबाईल अॅप्लीकेशन
बल्क एसएमएस,
बल्क व्हॉटसअॅप
बल्क व्हाईस कॉल ,
स्क्रीन प्रोजेक्टर,निवडणुक जिंकण्यासाठी सर्व काही
92245248928879095222
02225301947
Email:dhuriexpress@gmail.com
YouTube:http://tv.dhuriexpress.co.in
Website:www.dhuriexpress.co.in
facebook:www.facebook.com/dhuriexpressmumbai

Unknown said...

Bablu che te 6 wholesale dhande kuthale tyacha mahit milel ka mumbait karnare Atul 9029798239 WhatsApp